Monday, 18 February 2019

वाट


हो, पुन्हा तीच संध्याकाळची, अंधाराची वाट पाहण्याची वेळ,
हो पुन्हा तीच... 
सकाळी थोडा उशीर झाला उठायला,
पण सूर्य कोणाची वाट पाहत नाही. 
वाट पाहायचा मक्ता घेतलाय तो फक्त स्रीने... 

प्रत्येक वेळी योग्य वेळेची वाट पाहण्यात
अख्ख आयुष्य निघून जातं,
दुपारी जेवायला येणाऱ्या मुलांपासून
ते रात्री पिऊन येणाऱ्या नवऱ्यापर्यंत,
कुटुंबाच्या वेळेची काळजी करता करता
वेळ कशी निघून जाते ते तिचं तिलाच कळत नाही... 

दिवसा ती तांब्या घेऊन बाहेर जाऊ शकत नाही,
"मानवी श्वापदांची" भीती असते
म्हणूनच कि काय कदाचित जंगली श्वापदांपासून
अगदी साप-विंचवापर्यंत कोणाचीही
भीती न बाळगता ती अंधारात निघते
आणि मग विषारी सापांच्या रोषाला बाली पडते,
किंवा मग घडतं बदायूं सारखं काहीतरी... 

हा इतका त्रासही स्री-माउली साठी कमीच होता,
म्हणूनच की काय देवानं जगाच्या पुनर्निर्मितीचं
दिलेलं 'वरदान'च तिच्यासाठी 'शाप' ठरतं... 

"त्या" दिवसात तिची होणारी कुचंबणा
ना कोणी समजून घेणारं असतं,
ना कोणी समजून घेऊ शकतं,
झिजलेल्या कपड्याच्या चिंध्या जपून कोणाला दिसू नये,
कळू नये म्हणून घरातल्या कोपऱ्यात किंवा
कच्च्या न्हाणीच्या दगडाखाली गुंडाळून ठेवत,
ती आपलं स्त्रीत्व जपत फिरते,
आणि शेवटी मग योनी मार्गाचे आजार सहन करण्यास तत्पर.
फक्त एक वैयक्तिक स्वच्छतेची व आरोग्याची काळजी
घेण्याच्या माफक सुविधा न मिळाल्यामुळे...

अशा कारणामुळेच कदाचित मुली जन्माला येत नसाव्यात,
आल्या तर 'जगत' नसाव्यात आणि जगल्या तर... 
आणि जगल्या तर पुन्हा तीच संध्याकाळची अंधाराची वाट पाहण्याची वेळ,
हो पुन्हा तीच संध्याकाळची अंधाराची वाट पाहण्याची वेळ..... 

No comments:

Post a Comment