शतायुषी होण्याचं गुपित तुम्हाला सांगतो,
आमच्या घरी आम्ही रानभाज्या आणतो...
शेवगा असतो अंगणात, उंच उंच वाढलेला,
पाठी परसामध्ये असतो, अळू, वांगा पेरलेला।
हिरव्या मिरच्या, कडी पत्ता, पाहिजे तेंव्हा काढतो,
आमच्या घरी आम्ही रानभाज्या आणतो।।
घरच्या घरी भाजीपाला, रासायनिक विष नसतं,
आनंद होतो खाताना जे स्वकष्टाचं असतं।
ऋतू सोबत भाज्या बदलून गवार भेंडी काढतो,
आमच्या घरी आम्ही रानभाज्या आणतो।।
भाजी असते ताजी नसते कुपोषणाची भीती,
परसात बाग, बागेत भाज्या हीच आपली रीती।
आपल्या भल्या चाली-रीती आम्हीं देवा पाळतो,
आमच्या घरी आम्ही रानभाज्या आणतो।।
शतायुषी होण्याचा गुपित तुम्हाला सांगतो,
आमच्या घरी आम्ही रानभाज्या आणतो...