मी गप्प रहातो,
लोकशाहीला झालेल्या जखमा बंद डोळ्यांनी पहातो,
मी गप्प रहातो,
धर्मांधतेच विष समाजात कालवत असेल कोणी,
एकमेकांवर चिखलफेक करत असेल कोणी,
वाटत असेल मतदारांना वोटा साठी नोट,
दारू मटणाची पार्टी करत असेल कोणी,
मीही वाहत्या नदीत हात धुत जातो,
गप्प रहातो,
लोकशाहीला झालेल्या जखमा बंद डोळ्यांनी पहातो,
मी गप्प रहातो...
आपलं जसं तसं चालून जातं,
दोन वेळेस जेवण मिळून जातं,
'काहीतरी' करून मिळवली डिग्री,
समोरच्याला हे कळून जातं,
अशा डिग्री वर मी रोजगार मिळवू पहातो,
गप्प राहतो,
लोकशाहीला झालेल्या जखमा बंद डोळ्यांनी पहातो,
मी गप्प रहातो...
सरकारी ऑफिसमध्ये मी नेहमी 'सेटिंग' करतो,
भ्रष्टाचाराविरोधात असतो पण, अधिकाऱ्यांचे खिसे भरतो,
माझे खिसे भरण्यासाठी कधी दलाली पण करतो,
मी पण इमान विकून श्रीमंत होऊ पहातो,
गप्प रहातो
लोकशाहीला झालेल्या जखमा बंद डोळ्यांनी पहातो,
मी गप्प रहातो...
भारत माझा देश आहे, पण मला काय त्याचं,
आम्ही भारताचे लोक, पण मला काय त्याचं,
देश चाललाय, कुठेतरी, पण मला काय त्याचं,
राजकारण्यांच्या बुद्धिबळाचा नकळत, प्यादा होत जातो,
गप्प रहातो,
लोकशाहीला झालेल्या जखमा बंद डोळ्यांनी पहातो,
मी गप्प रहातो...